दौंड : बारामती-दौंड तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या माळेगाव येथे अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरून धनगर व गव्हाणे कुटुंबातील ८ ते १० लोकांनी संबंधित विभागाच्या पोलिसांवरच हल्ला करीत, शिवीगाळ व दमदाटी केली. रात्रीच्यावेळी आमच्या घरी येऊन गर्भवती महिलांसह मुला-बाळांना मारहाण केल्याचा आरोप हल्लेखोरांनी केला.
संबंधित संशयित व्यक्तींनी सरकारी व खासगी अशा दोन चारचाकी गाड्या फोडल्या. ही घटना गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवे यांच्यासह पोलिसांनी प्रयत्न केले. गव्हाणे व धनगर कुटुंबियांनी एकत्रित येत माळेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत, आरडाओरडा केली. रात्रीच्यावेळी हा गोंधळ झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. परिणामी पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी केली होती.
माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून धनगर व गव्हाणे कुटुंबियांनी सरकारी कामात अडथळा आणला. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडाने हल्ला केला.
हाताने माराहाण केली तसेच सरकारी गाड्या फोडल्या, अशी तक्रार राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक विजय वसंतराव रोकडे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केली. फिर्यादीनुसार, माळेगाव पोलिसांनी किशोर जनार्दन धनगर, पिंटू गव्हाणे यांच्यासह ८ ते १० लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी करणे, सरकारी गाड्या फोडून नुकसान करणे, दहशत पसरवणे आदी कलमांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिकारी देविदास सावळी यांनी दिली.