पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नियमानुसार शासनाकडून ३२ (२) ची नोटीस पुरंदर तालुक्यातील ७ गावांमधील गावकऱ्यांना दिली होती. संबंधित गावांतील नागरिकांनी शुक्रवारी (दि.२) रोजी ड्रोन सर्वेक्षणासाठी विरोधाची भूमिका दर्शविली होती. मात्र, शनिवारी (दि. ३) रोजी सर्वेक्षणासाठी अधिकारी आणि कर्मचारी आल्यानंतर पोलिसांच्या अंगावर बैलगाडी सोडली आणि त्यांच्यावर दगडफेक केली. यात काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. मात्र, पोलिसांनी ही परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. सध्या हे सर्वेक्षण थांबविण्यात आले आहे. पुढील बैठकीनंतर ड्रोन सर्वेक्षण कधी करायचे ? हे ठरविण्यात येईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
याबाबत पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले की, संतप्त शेतकऱ्यांनी आमच्यावर दगडफेक केली. त्यात आमच्यापैकी काही कर्मचारी आणि पोलिस जखमी झाले. त्यामुळे सौम्य स्वरूपाचा लाठीमार पोलिसांना करावा लागला. आम्ही शांततेने परत जात असताना हा प्रकार घडला. प्रामुख्याने शांततेने प्रक्रिया सुरू असताना शेतकरी संतप्त होत आहेत. त्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.