सासवड: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 30 नोव्हेंबर अखेर पुरंदर मध्ये 26,716 शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण 225 कोटी 97 लाख 95 हजार रुपयाचे पीक कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी दिली. बँकेच्या पुरंदरमध्ये 13 शाखा असून, 95 विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून 21 हजार 686 हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पीक कर्ज हे देण्यात आले असून मार्च अखेरपर्यंत पीक कर्ज वाटप हे सुरू राहणार आहे. सासवड( ता. पुरंदर) येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयात संजय जगताप यांनी बँकेचे अधिकारी व विकास सोसायटीच्या सचिवाची बैठक घेऊन पीक कर्जाबाबत सूचना केल्या आहेत.
बँकेच्या पुरंदर विभागात 534 कोटी रुपयांहून अधिक ठेवी पोहोचल्या आहेत. सन 2024 -25 मध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी 222 कोटी दहा लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात 225 कोटी 97 लाख 95 हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा ,गुलाब, जरबेरा, कारनेशन ढोबळी मिरची, तूर, मूग, उडीद, भात ,ज्वारी, बाजरी, कपाशी ,मका, सूर्यफूल, सोयाबीन अशा विविध पिकासाठी कर्ज वाटप होत असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.