पुणे : पुण्यातील धनकवडीमध्ये पायी जाणार्या नागरिकाला जाणूनबुजून चोरीच्या उद्देशाने धक्का मारुन पाया पडण्याचा बहाणा करुन खिशातील पैसे चोरणार्या दोन सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आस्लम इस्माइल शेख (वय 21 वर्ष, रा. नवीन म्हाडा, सातववाडी, हडपसर) आणि साद अकबर पठाण (वय 23, रा. वेस्टर्न गल्ली, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी, दीपक रामराव मोरे (वय 37, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धनकवडीतील शाहू बँक चौकातील साईबा टी स्टॉलच्या बाजूला 9 एप्रिल रोजी घडली. फिर्यादी दीपक मोरे हे पायी जात असताना दुचाकीजवळ उभे असलेल्या दोघांनी त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना धक्का दिला. त्यानंतर धक्का लागल्यामुळे त्यांची माफी मागण्याकरीता पाया पडण्याचा बहाणा करुन त्यांच्या पँटच्या खिशामध्ये ठेवलेले 30 हजार रुपये नकळत काढून घेतले. त्यानंतर ते तिथून निघून गेले होते. याबाबत मोरे यांनी फिर्याद सहकारनगर पोलिस ठाण्यात दिली. तपास करीत असताना घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी अंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
दुसरी घटना उघडकीस…
दरम्यान, गुन्हेगारांच्या अधिक चौकशीत त्यांनी आणखी एका नागरिकाचे 10 हजार रुपये अशाच पद्धतीने चोरल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कैलाश विश्वनाथ राजहंस (वय 51, रा. कात्रज गाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज मठाजवळ 18 ऑक्टोबर 2024 रोजी घडला होता. चोरट्यांनी कैलाश यांच्या खिशातील 10 हजार रुपये चोरले होते.
सदरची कामगिरी, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली.