pune crime : पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. हीच नामी संधी समजून चोर, दरोडेखोर देखील चोरीसाठी सज्ज झाले आहेत. मंचर (जि. पुणे) येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. एकूण सात जणांनी मिळून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. चोरी करण्याच्या हेतूने सोने-चांदीचे दागिने बॅगमध्ये भरण्यास सुरवात केली. परंतु अवघ्या पाच मिनिटांत पोलीस आले अन् चोरी उघडकीस आली.
सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. काही हत्यारांचा वापर करत त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला.
दरम्यान, पोलिसांना फोन आल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरट्यांकडून कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.
या घटनेते दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे का? हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या टोळीतील दरोडेखोर अट्टल आहे. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची शक्यता उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केली.
अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव बाळू रोकडे, गणेश रामचंद्र टोके, अजय सखाराम भिसे, ग्यानसिंग भोला वर्मा, मोहम्मद अरमान दर्जी यांचा समावेश आहे.