पुणे : लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरु असल्याचे सांगत अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर भागात गुरुवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आणि त्या महिलेस म्हणाला, आमचे साहेब लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत. चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने त्यांचे दागिने चोरले. त्यानंतर चोरटा दागिने घेऊन तेथून पसार झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत.