दौंड : दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना समोर येत आहेत. अशातच दौंड तालुक्यातील केडगाव चोफुला येथील शनिवार (दि. १५) रोजी ५ मेडिकल तर यवत येथील ५ असे एकूण १० मेडिकल दुकानं चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी आता सोने, चांदी, मोबाईल नव्हे तर मेडिकल दुकानांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चोरट्यांनी सोन्याची दुकाने, मोबाईलची दुकाने, इतर महागड्या वस्तू ची दुकाने फोडली होती. मात्र आता चोरट्यांनी आपला मोर्चा मेडिकल दुकानाकडे वळवला आहे. या चोरीतील एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये 5 मेडिकल दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात असलेली रोकड लंपास केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव चोफुला येथे चोरट्यांनी ५ मेडिकल दुकानांचे शटर उचकटून अनेक दुकानात असलेली रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस केली आहे. यातील चोफुला येथे दवा मेडिको मेडिकल असलेल्या या एका दुकानातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोफुला नाव्हरा रोडवर असलेल्या पार्वती मेडिकलमध्ये चोरट्यांनी रात्री 2.30 वाजता शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील काउंटरमध्ये असलेली 10 हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी तिथून पळ काढला.
शेजारील काही अंतरावर असलेल्या श्री मेडिकल, मुक्ताई मेडिकल, दवा मेडिको मेडिकल, कमल मेडिकल या दुकानासोबतच यवत येथे 4 ते 5 मेडिकल दुकानं यामध्ये चैतन्य मेडिकल या दुकानातील 35 हजार रुपयांसह,संजीवन मेडिकल, अलंकार मेडिकल,श्रीनाथ मेडिकल या दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांनी प्रत्येक मेडिकलमधील गल्यातील शिल्लक रोकड इतर वस्तूही लंपास करण्यात आल्या आहेत.