पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटले आहेत.. मात्र अद्याप या घटनेतील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.. आता कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेशच कोर्टाने दिले आहेत.त्याच्या नावावर ५ वाहने तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. ही सर्व संपत्ती आता जप्त होणार आहे. या आदेशामुळे तरी आरोपी समोर येईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..

आतापर्यंत या हत्या प्रकरणातील सात आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे… मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस अजूनही त्याचा शोध घेत आहेत..
त्याच्या तपासासाठी तब्बल पाच पथके रवाना आहेत. कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार असून सुदर्शन घुले याच्यासोबत अनेक दिवसापासून सोबत आणि बऱ्याच गुन्ह्यांत सहभाग राहिला आहे.
बीड जिल्ह्यातील मसाजोगंचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ६५ दिवसांनंतरही तो फरार आहे. आता त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी कोर्टाने पाऊल उचलले आहे. कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले, मात्र कृष्णा आंधळे हाताला लागत नाही. मात्र आता कोर्टाच्या आदेशानंतर तो समोर येईल का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.








