Pune Crime | पुणे : खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील दहा तोळ्यांचे दागिने चोरणार्या दोघांना वानवडी पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे.
शिवा राजू शिंदे (वय-३०), व के. तेजा ऊर्फ सूर्या शिंदे (वय-२०, रा. दोघेही गंगाखेड, परभणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात दिली होती.
३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त…
त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा ३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०२ एप्रिल) फिर्यादी महिला या लातूर ते पुणे या मार्गावर खासगी बसने प्रवास करत होत्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्या वानवडी भागातील क्रोम मॉलसमोर उतरल्या. संशय आल्याने त्यांनी बॅग तपासली असता त्यामधील दहा तोळ्यांचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. लागलीच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
दाखल गुन्ह्यात तपास करत असताना संशयित आरोपी हे परभणीतील गंगाखेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने गंगाखेड येथून आरोपी शिवा आणि सूर्या शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासणीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली.
सदरची कामगिरी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय भोसले, अंमलदार विनोद भंडलकर, महेश गाढवे, संदीप साळवे, विष्णू सुतार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Crime News | देहूरोड येथे रागाने का बघतो असे म्हणून चार जणांनी तरुणावर केले कोयत्याने वार
Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक