पुणे, ता. 20 : भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात कारवाईचा वेग वाढवला आहे. भेसळयुक्त पनीर, दूध, हॉटेल-रेस्टॉरंटमधील निकृष्ट खाद्यपदार्थ आणि शाळांमधील खाद्यपदार्थांच्या तपासणीनंतर आता खाद्यतेल विक्रीकडे एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत खाद्यतेलाबाबत नव्या नियमांची माहिती दिली.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेवर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, पॅकेजिंग, लेबलिंग आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांनी सांगितले की, खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थांशी संबंधित लागू असलेल्या नियमांचे पालन करूनच खाद्यतेलाचे उत्पादन आणि विक्री करणे आवश्यक आहे.

एफडीएकडून करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये खाद्यतेल उद्योगाशी संबंधित काही गंभीर त्रुटी आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषतः पॅकेजिंग, लेबलिंग आणि ब्रँडच्या नावाने विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या कामकाजात नियमांचे उल्लंघन आढळल्याचे मुंढे यांनी नमूद केले.
“सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” मोहिमेंतर्गत यापूर्वी हॉटेल, रेस्टॉरंट, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच शाळांमधील खाद्यपदार्थांबाबत अनुपालन आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी सुरू असून आता या मोहिमेचा पुढील टप्पा खाद्यतेलाच्या गुणवत्तेशी संबंधित असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
खाद्यतेल हा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराचा महत्त्वाचा पदार्थ असल्याने त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या उत्पादन आणि विक्री प्रक्रियेत नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे खाद्यपदार्थ विक्रेते आणि संबंधित व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. आता खाद्यतेलाच्या गुणवत्तेवर एफडीएचा ‘वॉच’ राहणार असल्याने नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.







