पुणे , ता. 12 : पुणेकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. परंतु, आज सोमवारी (ता.12) सायंकाळी साडेपाचनंतर पावसाने अचानक हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाने दररोज हजेरी लावली आहे. शहरात आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींमुळे पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दरम्यान, पुण्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या आसपास होता. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. मात्र या अवकाळी पडलेल्या पावसामुळे पुणेकर सुखावला आहे. तर पावसाच्या सरींमध्ये काही पुणेकरांनी भिजण्याचा आनंद लुटला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.