पुणे : पुण्यातील एनडीए रस्त्यावरील शिवणे ओैद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचुन आग तत्काळ आटोक्यात आणली.
अधिक माहिती अशी की, शिवणे येथील देशमुखनगर परिसरात इंडीटेक इलेक्ट्रो सिस्टीम कंपनी आहे. या पाच मजली इमारतीतीमध्ये तळमजल्यावर इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले होते. मात्र, रविवारी(9 मार्च) च्या सायंकाळी इलेक्ट्रिक साहित्याला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता आणि वारजे अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली.
इमारतीतील तळमजल्यावरील इलेक्ट्रिक साहित्याने पेट घेतला असता. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंंपनीच्या आवारात अग्निरोधक यंत्रणा नव्हती, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.