पुणे: पुण्यातील वानवडी भागात भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बीडमधील 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहत्या ठिकाणी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून, त्याने बाथरूममध्ये स्वतःचा गळा चिरून जीवन संपवलं आहे.
व्हॉट्सअॅपवर लिहिलेल्या सुसाईड नोटमधुन धक्कादायक खुलासा
उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त करून ती पुढील तपासासाठी पाठवली आहे.
या घटनेबाबत सोमवारी सकाळी 9:15 च्या सुमारास पोलिसांना फोनवरुन कळले. माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तपासाला सुरुवात केली. तरुणाचा मृतदेह वानवडी येथील पंचरत्न हाऊसिंग सोसायटी येथे असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहचले. तेंव्हा उत्कर्षचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरुममध्ये आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना उत्कर्षचा मोबाईल सापडला. उत्कर्षने व्हॉट्सअॅपवर सुसाईट नोट लिहिल्याचे आढळून आले. या सुसाईटनोटमध्ये आपण अभ्यासाच्या तणावात असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष हा मुळचा बीड जिल्ह्यातील आहे. उत्कर्षने भोपाळ एम्समध्ये नुकताच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला होता.