Pune Crime : पुणे शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकतीच वाघोली परिसरात घरासमोर उभा असलेला 12 चाकी ट्रक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रक मालक व्यावसायिकाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक हे वाघोलीतील विठ्ठलवाडी भागात वास्तव्यास आहेत. 28 सप्टेंबर रोजी त्यांनी घरासमोर 12 चाकी ट्रक पार्क केला होता. मात्र, 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने ट्रक चोरून नेला.

सकाळी नेहमीप्रमाणे ट्रकधारक व्यावसायिक बाहेर आले असता, ट्रक जागेवर दिसून न आल्याने त्यांनी तात्काळ वाघोली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार या प्रकरणाचा तपास करत असून, पोलिसांनी तक्रारदाराच्या घराजवळील तसेच नगर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.







