पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एका रिक्षाचालकाला थांबवून त्याला बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाची मागणी पूर्ण न केल्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारून ठार मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली. या घटनेने आता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना रविवार (दि. 28) रोजी रात्री कासारवाडीतील लांडगे मळा येथे घडली. कुंडलिक मच्छिंद्र पाटोळे (वय ३७, रा. पिंपळे गुरव) असं रिक्षाचाकच नाव असून, त्यांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंडलिक पाटोळे हे रात्री आपल्या रिक्षातून घरी जात असताना, कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस संशयितांनी त्यांना अडवले. आणि पैशाची मागणी केली. पाटोळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांपैकी ओंकार या व्यक्तीने कुंडलिक यांच्या डोक्यात दगड मारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातून 830 रुपये रोख रक्कम आणि 10 हजारांचा मोबाइल फोन जबरदस्तीने चोरून पळून गेले.

यानंतर पोटोळे यांनी दापोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, ओंकार चंदू काळे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







