पुणे: पुण्यातील (Pune Crime) बालाजीनगर परिसरात किराणा दुकान चालवणाऱ्या एका व्यापार्याने मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन (Pune News) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये उकळल्याचेही उघड झाले असून, या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बाबुराम मंगाराम चौधरी (वय 43, रा. बालाजी ट्रेडर्स, के.के. मार्केट, बालाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने, हरीशचंद्र मंगाराम चौधरी (वय 42, रा. भाभ्भुओं की ढाणी, बैठवासिया, ता. ओसिया, जि. जोधपूर, राजस्थान) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुलसी ऊर्फ चुकी भुराराम जांन्दु (वय 26) आणि मुकेश भुराराम जांन्दु (वय 24, रा. चैनाणियो की ढाणी, भटियाणी जी का थान रायमलवाडा, ता. बापिणी, जि. फलोदी, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराम चौधरी हे बालाजीनगर येथे किराणा दुकान चालवत होते. आरोपी तुलसी आणि मुकेश यांनी त्यांच्याशी प्रेमाचे नाटक रचले. या दरम्यान त्यांनी बाबुराम यांच्यासोबत अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी बाबुराम यांना ब्लॅकमेल केले.

या ब्लॅकमेलच्या छळातून आरोपींनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. सोनाराकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल खरेदी करून त्याचे बिलदेखील बाबुराम यांच्याकडून भरून घेण्यात आले. तसेच रोख रक्कम आणि मनी ट्रान्सफरद्वारे लाखो रुपये जबरदस्तीने घेतले गेले.
या सततच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून बाबुराम चौधरी यांनी 21 जुलै 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर नातेवाईकांनी राजस्थानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर गावातील लोकांशी संवादातून या आत्महत्येमागील सत्य बाहेर आले. चौकशीत आरोपींनी केलेल्या ब्लॅकमेलिंगची माहिती नातेवाईकांना मिळाली.
या घटनेला सुमारे 45 दिवस उलटून गेल्यानंतर मृत व्यापार्याचे भाऊ पुण्यात येऊन त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सहकारनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विश्वास आणि ओळखीच्या आडून अशाप्रकारे ब्लॅकमेलिंगचे जाळे विणले जाऊ शकते, याचा प्रत्यय या प्रकरणातून आला आहे. समाजात वाढत्या ऑनलाईन व व्यक्तिगत ब्लॅकमेलच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे ही कायदा अंमलबजावणी यंत्रणेसमोरील मोठी जबाबदारी असल्याचे स्पष्ट होत आहे.







