पुणे : पुण्यात मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सराइत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक गणेश पेठ परिसरात केली. त्याच्याकडून पाच लाख 88 हजारांचे 29 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. अझहर उर्फ बडे सय्यद (रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गणेश पेठेतील नाडे गल्लीत सोमवारी ( 25 मार्च) ला मध्यरात्री दोनच्या सुमारास सराईत सय्यद मेफेड्रोनची विक्री करणार असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश राठोड आणि समीर माळवदकर यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मेफेड्रोन विकण्याच्या तयारीत असताना सय्यदला पकडले. त्यानंतर त्याच्याकडून 5 लाख 88 हजारांचे मेफेड्रोन पोलिसांकडून जप्त करण्यात आले. आरोपी सय्यदने मेफेड्रोन कोणाकडून आणले, व तो त्याची विक्री कोणाला करणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
सदरची कारवाई, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबूब मोकाशी, तानाजी नागरे, गजानन सोनुने, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, महेश पवार यांनी ही कारवाई केली आहे.