लोणी काळभोर, ता. 3 : पुणे-नगर, हडपसर-सासवड या मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? असा सवाल अलिकडेच ‘पुणे प्राईम न्यूज’ने विशेष वृत्तलेखाद्वारे केला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पुणे महानगर पालिकेने सोमवारी (ता. 3) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते शेवाळवाडी या दरम्यान असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास सुरूवात केली.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर येथील वैभव थिएटर ते शेवाळवाडी येथील अतिक्रमणांवर पुणे मनपाने आजपासून कारवाईची बडगा उगारला आहे. महामार्गाच्या पुटपाथ पासून 30 फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहे. सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल, टपरी, दुकाने यांची अतिक्रमणे जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली आहेत.
शेवाळवाडीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी चिकन, मटणाच्या अनधिकृत टपऱ्या रस्त्यावरच थाटलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील ही दुकाने निघणार कि नाही? याबद्दल सर्वत्र चर्चा होती. मात्र महापालिकेने या अनधिकृत दुकानांवरही कारवाईचा हातोडा उगारला आहे. ही दुकाने पाडली आहेत. तसेच ही कारवाई महानगरपालिकेच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यापर्यंत करण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर हडपसर ते यवत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. हडपसर वैभव थेटरच्या जवळ, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी, मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी फाटा, कवडीपाट टोल नाका. लोणी स्टेशन, माळी मळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ते यवत पर्यंत अनेक ठिकाणी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत असून वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा येत आहे. मात्र आता अतिक्रमणे निघाल्यानंतर महामार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, कवडीपाट ते यवत पर्यंत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई उद्या मंगळवार (ता. 4) पासून पीएमआरडीए करणार आहे. याबाबत त्यांच्याकडून अतिक्रमण धारकांना सूचना दिल्या असून, त्यांची गाडी सोमवारी (ता. 3) स्वत:हून अतिक्रमणे काढण्यासाठी आवाहन करीत होती. त्यानुषंगाने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली आहे.
दुसऱ्या बाजूची अतिक्रमणे कधी निघणार?
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे महानगरपालिकेकडून हटविण्यात येत आहेत. मात्र रस्त्याच्या एकाच बाजूला अतिक्रमणे नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे आहेत. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गाच्या सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर अद्याप महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.