पुणे: एटीएम केंद्रामधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखी करीत एकाला ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील नवी पेठ परिसरातील एका एटीएममध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून एका ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल 50,000 हजार रुपये चोरट्यांनी काढल्याची घटना समोर आली आहे . १८ एप्रिल रोजी पीडित बालकृष्ण नाना सावंत हे शास्त्री रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम सेंटरला गेले असता तिथे हि घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात आरोपीने ज्येष्ठ नागरिकाला एटीएममधून पैसे काढण्यास मदत करत असल्याचे सांगून पैसे चोरल्याचा आरोप आहे. आरोपीने ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड स्वॅप केले. आरोपीने नंतर कार्डचा वापर करून पीडितेच्या खात्यातून ५०,००० रुपये काढले.
ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांना एटीएम वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.