पुणे: शहरातील स्वारगेट बस स्थानकात एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या दत्ता गाडेच्या गावातुन गुणाट येथुन वेगळाच वाद समोर आला आहे. त्याला गावातून अटक केल्यानंतर पोलिसांनी जाहीर केलेली एक लाख रुपयांची बक्षीसाची रक्कम गावात वादाचं कारण ठरली आहे. त्यामुळे सरपंचांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

शिरूरपासून सुमारे २० किमी अंतरावर गुणाट हे गाव आहे. हे गाव पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे मूळ गाव आहे. हा गुन्हा घडल्यानंतर जवळपास तीन दिवस आरोपी गाडे फरार होता. गुन्हा करून आरोपी दत्तात्रय गाडे आपल्या गावी जाऊन ऊसाच्या शेतात लपला होता. त्याचा लवकर शोध लागावा म्हणून पोलिसांनी टीप देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र याच बक्षीसाठी आता गावात गोंधळ सुरू आहे.
गुणाटचे सरपंच म्हणाले..
या प्रकरणी गावातील आरोपिला पकडून देण्याच्या श्रेयवादाने गोंधळ निर्माण झाल्यामुळे गुणाटचे सरपंच रामदास काकडे यांनी मोठी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, आरोपी गाडेला आम्ही पकडून दिलं असं अनेक ग्रामस्थ म्हणत आहेत. त्यामुळे बक्षिसाच्या एक लाख रुपयांवर अनेकजन दावा करत आहेत. त्यामुळे ही बक्षिसाची रक्कम नक्की कुणाला द्यायची यासंबंधी गावात गोंधळ सुरू झाला आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीची एक सभा घेऊन हे जाहीर करणार आहोत की या बक्षीसच्या रकमेतला एकही रुपया आम्हाला नको. यामध्ये ज्या ज्या ग्रामस्थांनी पोलिसांना आरोपी पकडण्यास मदत केली आहे त्या सर्वांशी आम्ही बोललो असता त्यांनीही या निर्णयाला होकार दिला आहे. असं सरपंच रामदास काकडे यांनी म्हटलं आहे.







