पुणे, ता. 17 : विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला श्रीमती एस. एस. सस्ते, विशेष न्यायाधीश (पॉक्सो) यांनी दोषी ठरवून 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सज्जन सहेआलम सलमानी (वय 24, रा. संतनगर, लोहगाव, पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोव्हेंबर 2022 मध्ये लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशन परिसरातील एका सलूनमध्ये ही घटना घडली होती. 7 वर्षे 6 महिने वयाचा पीडित बालक केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला असता, तिथे काम करणाऱ्या सज्जन सलमानी याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
विशेष सरकारी अभियोक्ता नितीन कोंगे यांनी मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पॉक्सो कलम 9 (एम) सह 10, 5 वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच भादवि कलम 506 6 महिने सक्षम कारावास आणि दोन हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी (सेवानिवृत्त) यांनी केला होता. त्यांना पोलीस हवालदार एस. के. डावखर यांनी सहकार्य केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी या गुन्ह्याला ‘दत्तक’ घेऊन तपासावर विशेष लक्ष दिले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 7 चे पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग प्रांजली सोनवणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे निरीक्षक शरद शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, कोर्ट पैरवीसाठी सहाय्यक पोलीस फौजदार विनोद कांबळे, महिला पोलीस अंमलदार व्ही. आर. दुरगुडे, हवालदार शिवराज चव्हाण, टी. एस. गाडेकर आणि महिला पोलीस हवालदार काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.







