चंद्रपूर: राज्यात भोंदूगिरीच्या घटना सुरू असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी विधवा महिला आणि कुमारिकांचा अघोरी पूजेसाठी वापर केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणामुळे सामाजिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन्यजीव तस्करी प्रकरणात 12 एप्रिल रोजी 6 जणांना अटक करण्यात आली. या आरोपींचे मोबाईल तपासताना धक्कादायक माहिती समोर आली. त्यामध्ये स्मशानभूमीत केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ, घुबडांचे फोटो, तसेच अनेक महिलांचे खासगी आणि नग्न फोटो आढळले. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवलेली असल्याचेही समोर आले आहे.
तपासात असेही उघड झाले की, या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पसरलेले होते. जवळपास 50 मध्यस्थ या रॅकेटमध्ये सक्रिय होते. ‘टेस्टर’ या कोडनेमखाली काम करणारा मांत्रिक महिलांना आणि प्राण्यांना अघोरी पूजेसाठी योग्य आहे की नाही, हे ठरवत होता.
या टोळीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केली. गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत महिलांना जाळ्यात ओढले गेले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने या घटनेचा तीव्र निषेध करत नागरिकांनी अशा भोंदूंच्या नादी लागू नये, असे आवाहन केले आहे. कार्यकर्ते हरीभाऊ पाथोडे यांनी सांगितले की, विधवा आणि कुमारिका या सहज लक्ष्य बनतात.
सध्या 6 आरोपी वनकोठडीत असून मुख्य मांत्रिक अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस विभागाकडे सोपवण्याची तयारी सुरू असून, आरोपींच्या मोबाईलमधील माहिती पाहून पोलीसही हादरले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.







