पुणे : महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या व्यक्तीवर स्वतःसाठी नियुक्त केलेल्या महिला बाऊन्सरचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश मधुकर धिवार (वय 50, रा. पद्मावती, सहकारनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
धिवार यांनी प्रभाग क्रमांक 36 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. निवडणूक प्रचारादरम्यान सुरक्षेसाठी त्यांनी एका महिलेला बाऊन्सर म्हणून नियुक्त केले होते. संबंधित महिलेने सुरक्षा सेवेसाठी ठरलेले मानधन देण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने दुसऱ्या दिवशी पैसे देण्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर आरोपीने महिलेला बाजूला येण्यास सांगून अयोग्य स्वरूपाचे वक्तव्य केले आणि मनाला लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जयश्री शेळके करत असून, अधिक तपास सुरू आहे.







