IAS Pooja Khedkar: नवी मुंबईत एका गाडीला ट्रक घासल्याची घटना घडली होती. त्यानंतर ट्रक हेल्परचे अपहरण करून त्याला पुण्यातील बाणेर परिसरातील एका बंगल्यात डांबून ठेवल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, हा बंगला बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या वडिलांचा असल्याचे उघडकीस आले आहे.

आता या प्रकरणात आयएएस पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) वडील दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात थेट सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याचा आणि पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलीप खेडकर हे सध्या फरार आहेत.
अपघातानंतर थेट अपहरण (IAS Pooja Khedkar)
शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरमध्ये अपघात झाला. अपघातानंतर लँड क्रूझरमधील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले.

हा प्रकार पाहिल्यानंतर ट्रकचालक चंदकुमार चव्हाण यांनी तात्काळ ट्रक मालक विलास ढेंगरे यांना माहिती दिली. त्यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दिलीप खेडकर यांचा सहभाग (Dilip Khedkar)
अपहरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी कारचा माग काढत MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला. ती गाडी पुण्यात बाणेर रोडवरील एका बंगल्याबाहेर आढळली. चौकशीतून समोर आले की, हा बंगला दिलीप खेडकर यांचा आहे. दिलीप खेडकर हे बडतर्फ आयएएस पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) वडील आहेत.
मनोरमा खेडकरचा कारनामा (Manorama Khedkar)
दरम्यान, पोलीस पथक अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेत बंगल्यावर गेले असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. तसेच पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांच्या अंगावर घरातील कुत्रे सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
काही वेळाने हेल्पर प्रल्हाद कुमार याला पोलीस ताब्यात घेण्यात यशस्वी झाले. मात्र, याच दरम्यान दिलीप खेडकर हे दुसऱ्या मार्गाने पळून गेले, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर सध्या फरार असून, त्यांचा पोलीस विविध ठिकाणी शोध घेत आहेत. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







