पुणे: हडपसरमध्ये आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात लोकांना भेट देण्यासाठी टीव्ही, मायक्रो ओव्हन देण्याची मागणी करुन ती न दिल्याने व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देणार्यावर हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
इम्तियाज इद्रीस मेमन उर्फ बहिऱ्या (वय 40, रा. जिजामाता वसाहत, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत वसीम हनीफ शेख (वय 47, रा. घोरपडी गाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इम्तियाज मेमन हा सराईत गुन्हेगार असून त्यावर याआधी चोरी, दंगल, दरोडा, जाळपोळ, खंडणीचे तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत.
याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. ते घोरपडी गावातील मस्जिदचे ट्रस्टी आहेत. इम्तियाज मेमन याच्या ओळखीने त्यांची युवराज तोरडमल यांच्याशी ओळख झाली. 2023 मध्ये मस्जिदच्या कब्रस्तानचे मोकळ्या जागेत होर्डिंग लावण्यासाठी त्यांनी युवराज तोरडमल यांच्याकडून 20 हजार रुपये घेतले होते. परंतु, कब्रस्तानच्या जागेचा वक्फ बोर्डमध्ये वाद सुरु असल्याने त्यांनी युवराज यांना होर्डिंग लावू दिले नाही. त्यानंतर युवराज याने त्यांना दिलेले पैसे मागितले. तेव्हा त्यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत, नंतर देतो, असे सांगितले.
मेमन याने फिर्यादी यांना फोन करुन होम मिनिस्टर या कार्यक्रमात बक्षिस वितरणासाठी टीव्ही नाही तर मायक्रो ओव्हन दे, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी मी सध्या त्रासलेलो आहे, माझी परिस्थिती नाही, असे सांगितले. त्यावर त्याने पुन्हा फोन करुन धमकी दिली की, माझ्या सांगण्यावरुन युवराज याने तुला पैसे दिले होते. मी सांगितले म्हणून तो आतापर्यंत थांबला आहे. ते पैसे तु मला दे, असे बोलला. त्यावर फिर्यादी यांनी ते पैसे मी युवराजला देईन, असे सांगितले. त्यावर मेमन याने शिवीगाळ करुन ‘तू जर पैसे दिले नाही तर तुला उचलून नेईन,’अशी धमकी दिली. त्यामुळे त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे वाटल्याने त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.
इम्तियाज इद्रीस मेमन उर्फ बहिऱ्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडक, चतुश्रुंगी, वानवडी, कोंढवा, हडपसरमध्ये तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चोरी, दरोडा, दंगल, जाळपोळ खंडणी अशा गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. याआधी हडपसर मध्ये पोलिसांचे बनावट आयकार्ड बनवून त्याने खंडणी मागितली होती.
आयकार्डमुळे पोलीस कारवाई करीत नव्हते, त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देऊन हा सराईत गुन्हेगार ब्लॅकमेलिंग करत असतो, काही महिन्यांपूर्वी हडपसर मधील एका प्रतिष्ठित वाईन्स मालकास हफ्ता मागितला होता तेव्हा त्यास चांगला चोप दिला होता. समाजात अनेक गंभीर गुन्हे करून उधळ माथ्याने फिरणाऱ्या, नाहक व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला मोक्का लावावा, पुण्यातून हद्दपार करावे अशी मागणी पीडित नागरिक करीत आहेत.
तथाकथित पत्रकार आहे बातमी छापतो असे सांगून अनेकांना इम्तियाज मेमन उर्फ बहिऱ्याने ब्लॅकमेल केले आहे. बांधकाम अर्ज देणे तसेच कारवाई थांबवतो असे सांगून हडपसर, कोंढवा भागात आरोपीने अनेकांना गंडा घातला आहे. यामध्ये त्याच्या सोबत माजी नगरसेवकाचा देखील समावेश आहे. जे या गुन्हेगारास सपोर्ट करतात आणि संगनमताने पैसे कमावतात. या खंडणीखोर गुन्हेगाराची कुंडली जनतेसमोर आली पाहिजे. ज्या पक्षाचे नाव वापरून उद्योग चालतो त्या पक्षाने सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.