पुणे : पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट समोर आलं आहे. पोलिसांनी कारवाई करत तब्बल 28 लाख 66 हजार 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. भारती गवंड, सचिन यमगर, मनिषा ठाणेकर, नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता आरोपी ज्या प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छापत होता, ते प्रिंटर सापडले आहे. यावेळी आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना बँकेत बनावट नोटा जमा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या प्रकरणाचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. अखेर तपास करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी 28 लाख 66 हजार 100 रुपयांच्या प्रिंट केलेल्या बनावट नोटा आणि 2 लाख 4 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत.