राजेंद्रकुमार शेळके
(Pune) पुणे : साप दिसताच त्याला मारण्यासाठी नागरिक धाव घेतात. परंतु सगळेच सापांचे देखील जीवन आहे. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. हे माणूस विसरतो. असे असताना देखील अनेक जण आपल्या परिसरात साप आढळून आल्यास सर्प मित्रांना त्याची माहिती देतात. सर्पमित्र सापाला पकडून जीवनदान देतात. असाच एक अवलिया सर्पमित्र सापांना वाचवतोच पण त्यासोबत प्रबोधन देखील करतो.
वैभव सुतार असे त्याचे नाव…!
मुळचा कोल्हापूर येथील हा सर्पमित्र आहे. व्यवसायाच्या व नोकरीच्या निमित्ताने पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे येथे स्थायिक झाला आहे. वैभव सुतार असे त्याचे नाव आहे. वैभवचे पिरंगुट,लवळे फाटा मि.वडेवाले व चायनीज सेंटरचे छोटेखाणी हॉटेल आहे. व्यवसाय करत असला तरी त्याला सर्पमित्र म्हणूनच ओळख हवी आहे. त्याासाठी प्रबोधनाचे कामही करतो.
गेल्या ७ वर्षांपासून वैभव वेगवेगळ्या प्रकारचे ( विषारी,बिनविशारी ,निमविषारी ) असे सर्व साप पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान देण्याचे काम करत आहे. कोणाच्याही घरात, हॉटेलमध्ये किंवा कंपनीच्या आवारात किंवा रोडच्या बाजूला कुठेही साप दिसला तर वैभव हे तातडीने त्याठिकाणी जावून त्याला पकडून निसर्गाच्या मोकळ्या सानिध्यात सोडून देतो.
वैभवने आापर्यंत शंभरहून अधिक सापांना पकडून निसर्गात सोडले आहे. कोणताही साप विनाकारण चावत नाही. आपल्याकडून नकळत त्याला काही त्रास झाला किंवा नजरचुकीने त्यावर पाय पडला तर तो स्वरक्षणासाठी समोरच्या व्यक्तीवर धावून जातो. पण लोकांना याची जाणीव नसल्यामुळे ते साप दिसतात त्याला मारण्यासाठी धावतात. निसर्गामध्ये प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. ७ वर्षांपूर्वी असेच मी पाहिले होते आमच्या गावात एका शेतकऱ्याच्या घरा बाहेर दाम्हण या जातीचा साप निघाला होता. त्यावेळी तिथल्या जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्याला काठीने मारायला सुरवात केली. ते पाहून मी सापांचा अभ्यास करायला सुरवात केली. असे वैभव सांगतो.
सर्व सापांची पूर्ण माहिती करून घेतल्यानंतरच साप पकडायला सुरवात केली. तेव्हापासुन् खूप सापांचे जीवन वाचवले आहे. जीव वाचून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. प्रत्येक साप विषारी नसतो. आपल्या देशात तरी जास्त विषारी असणाऱ्या अशा फक्त 4 जाती आढळून येतात. नाग, मण्यार, घोणस, फुरसे या त्या चार जाती आहेत. बाकी साप हे बिनविशारी किंवा निमविषारी असतात ज्यांच्या चावण्याने जास्त काही इजा होत नाही. मात्र याची माहिती लोकांना नसते. त्यामुळे साप दिसताच त्याला मारण्यासाठी लोक धावतात. असेही वैभवने सांगितले.