केडगाव, ता. 29 : आदर्श ग्राम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गलांडवाडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच रेश्मा चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली होती.
गलांडवाडीचे सरपंच रमेश पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी प्रकाश शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने गलांडवाडीचे सरपंच रमेश पासलकर यांनी प्रकाश शेलार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामसेवक संदिप ठवाळ यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.
निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दौंड भाजपचे सरचिटणीस उमेश देवकर विद्यमान सरपंच रमेश पासलकर, बाळासो शितोळे, संदिप शितोळे,राजेंद्र चव्हाण, माजी सरपंच उत्तम खाडे, राजेंद्र शेलार, आबा शिंदे, मावळत्या उपसरपंच रेश्मा चव्हाण, वर्षा देवकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच प्रकाश शेलार निवडीनंतर म्हणाले, “आजपासून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेऊनच काम करणार आहे. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला उपसरपंच पदाची संधी दिल्याने सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो.”