पुणे : पुण्यातील कात्रज भागात अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बसच्या धडकेने दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना खोपडेनगर परिसरात घडली. या अपघातात दोन पादचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश चोकला आणि गिरीधारीलाल जाट अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची नावे आहेत. अपघातात पादचारी अर्जुन जुजाराम देवासी (वय २३, रा. नेहरुनगर, पिंपरी), प्रवीण प्रजापती (वय २३) जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालक किरण रवींद्र महादे (वय २९, रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल कात्रज भागातील खोपडेनगर परिसरातून निघाले होते. डोंगर उतारावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच तेथून निघालेले पादचारी अर्जुन आणि प्रवीण यांना बसचा धक्का लागल्याने ते जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि गिरीधारीलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे अधिक तपास करत आहेत.