पुणे : वैभवशाली सांस्कृतिक पुण्याची ओळख जपण्यासाठी तसेच वाढत्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी सांगितले.
मनसेच्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गोपाळकृष्ण गोखले चौकात व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘ड्रग्जमुक्त पुणे’ जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरोळे बोलत होते. यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे, गणेश सातपुते, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिला शहराध्यक्षा वनिता वागस्कर, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, शहर सचिव रवि सहाने, नरेंद्र तांबोळी, परिक्षित शिरोळे यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधताना निरोगी सुदृढ मन आणि सुदृढ शरीर ठेवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला पुणेकरांना दिला. या कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी केले.
दरम्यान, पुणे पोलिस नार्कोटिक्स शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘ड्रग्जमुक्त पुणे’ जनजागृतीचा संदेश देणारे विविध फलक तसेच कॅन्डल मार्चच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. या अभियानात युवा स्पंदन सामाजिक संघटना तसेच युवकांनी सहभाग नोंदवला.
मनसेची ‘ड्रग्जमुक्त पुणे’ चळवळ सकारात्मक ठरेल
शिरोळे म्हणाले, “ऐतिहासिक तसेच साहित्यिक वारसा असलेल्या पुणे शहरात वाढलेल्या व्यसनाधीनतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मनसेच्या वतीने ड्रग्जमुक्त पुणे जनजागृती अभियान चळवळ सकारात्मक ठरेल”.