-बापू मुळीक
सासवड (पुणे) : सासवड नगरपरिषद व तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर यांच्यामार्फत सासवड शहरामध्ये डेंग्यू आजारावर नागरिकांमध्ये जनजागृती व उपाययोजना करण्याबाबत घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हे दि. 06ऑगस्ट ते 07 ऑगस्ट या दिवशी करण्यात येत आहे.
यामध्ये ग्रामीण भागातील 50 आशा स्वयं सेविकांचा सहभाग घेऊन संपूर्ण सासवड शहरामधील घरोघरी जाऊन सिमेंट टाक्या, दूषित पाणी, बॅरल, टायर, कुंड्या, फ्रीज नारळाच्या करवंट्या इ. ची तपासणी करून डास, आळी आढळून आलेले कंटेनर रिकामे करणे तसेच तापाचे रुग्ण, याबाबत माहिती घेऊन त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना माहिती पत्रकाव्दारे कळवून डेंग्यु या आजारावर उपाययोजना बाबत जनजागृती सुरु आहे.
नगरपरिषदेच्या वतीने सातत्याने डेंग्यू या आजारावर सर्व्हे व जनजागृती सुरु असून जंतुनाशक पावडर फवारणे, गप्पी मासे टाक्यामध्ये सोडणे, स्प्रे पंपाने डास प्रतिबंधक औषध फवारणे, फॉगींग मशिनने धुरळणी करण्याचे काम सुरु आहे. हा उपक्रम सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे व नगरपरिषदेचे आरोग्य विभागप्रमुख मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात येणार आहे. डेंगू, चिकुनगुण्या, मलेरिया सारखे आजार होऊ नये म्हणून खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी. सर्व नागरिकांनी घरातील पाणीसाठे संपूर्ण झाकून ठेवावे.
आपल्या वापरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत. घरामध्ये पाण्याचे साठे पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेऊ नये. रोजची रोज भांडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून वापरावी. घरामध्ये असणाऱ्या कुलर, फ्रीज, फ्लॉवरपॉट, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्याचे डबे अथवा इतर टाकाऊ वस्तू यामध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. घराबाहेरील परिसरात असणाऱ्या रिकामी शहाळे, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या रिकामे डबे, टायर्स, इ. मध्ये पावसाचे पाणी किंवा इतर सांडपाणी जास्त साठवू नये, या साठी या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. गच्चीवर असणाऱ्या अथवा जमिनीवर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट बसवावीत. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.