उरुळी कांचन (पुणे) : कॉंग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३०० कोटींपेक्षा जास्त रोकड सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ हवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानक परिसरात सोमवारी (ता. ११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पुणे जिल्हा महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, भाजपचे राज्य व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष विकास जगताप, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, सोमनाथ कोतवाल, गुरुनाथ मचाले, सुनील तुपे, आबासाहेब चव्हाण, गणेश चौधरी, अमित कांचन, नितीन टिळेकर, मच्छिंद्र कड, सुभाष कुंजीर, रेखा वाळके, कविता खेडेकर, सुप्रिया गोते, पूजा सणस, रूपाली गोते, सविता वर्मा, विद्या काळभोर, आशुतोष तुपे, अक्षय रोडे, गणेश घाडगे, निखिल कोंडे, करण कंक, आदित्य बगाडे, सचिन काळे, सुनील गायकवाड आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष शामराव गावडे म्हणाले, कॉंग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे आयकर विभागाने छापे मारले. या छाप्यात साडेतीन कोटींपेक्षा जास्त मालमत्ता सापडली आहे. या कॉंग्रेस पक्षाच्या खासदारांकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असेल तर देशाचे काय चांगले करणार, हे दिसून येते. कॉंग्रेसचा खरा चेहरा या खासदाराच्या माध्यमातून पुढे आला आहे. कॉंग्रेस पक्षाचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत.”
दरम्यान, पूनम चौधरी, शामराव गावडे, विकास जगताप, गणेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. धीरज साहू यांना कडक शासन व्हावे अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.