पुणे: शहरातील मिळकतधारकांना महापालिकेकडून येत्या गुरुवारपासून (दि. १ मे २०२५) मिळकतकराची बिले पोस्टाने, तसेच ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. पालिका प्रशासनाकडून या बिलांच्या छपाईचे काम वेगाने सुरू असून, ती लवकरच पोस्ट खात्याकडे पाठवण्यास सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.
दरवर्षी १ एप्रिलपासून मिळकतकराची बिले दिली जातात. मात्र, मागील वर्षी निवासी मिळकतींना दिल्या जाणाऱ्या ४० टक्के कर सवलतीच्या अर्जामध्ये मोठा गोंधळ झाला होता. या अर्जाची छाननी करणे आणि पात्र नागरिकांना ही सवलत कायम ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यंदा बिले सुमारे एक महिना उशिराने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आता हे काम जवळपास पूर्ण झाले असून, महापालिकेकडून पुढील आर्थिक वर्षाच्या बिलांची छपाई सुरू आहे. महापालिकेकडून २०२५-२६’ या आर्थिक वर्षासाठी शहरातील जुन्या हद्दीतील सुमारे दहा लाख मिळकतींना विले दिली जाणार आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतकर आकारणीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.