दीपक खिलारे
इंदापूर : येथील प्रा. जयश्री गटकुळ यांना ऑल इंडिया लिनेस क्लबच्या वतीने देशपातळीवरील ‘शिखर महिला परिषद २०२३’मध्ये स्टार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथे ऑल इंडिया लिनेस क्लबच्या वतीने देशपातळीवरील ‘शिखर महिला परिषद २०२३’ पार पडली. या वेळी प्रा. जयश्री गटकुळ यांना ऑल इंडिया लिनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ. आशा माथुर, डॉ. इंदुजी मेहता, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. जयश्री गटकुळ यांनी लिनेस क्लबच्या माध्यमातून नेतृत्व करत, समाजमाध्यमातून निधी उभा केला. या निधीमधून सामजिक उपक्रम राबवित तळागाळातील लाखो गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी योगदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया लिनेस क्लबने त्यांचा गौरव केला आहे.
पुरस्कारानंतर बोलताना प्रा. जयश्री गटकुळ यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कामानिमित्त दौरा करताना इंदापूर दिव्यध्वनीच्या सचिव उज्वला गायकवाड, दिव्यध्वनीच्या खजिनदार कल्पना भोर तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महिला भगिनींचे सहकार्य लाभले म्हणून देशपातळीवर मिळालेल्या पुरस्कारामध्ये आमच्या महिला भगिनींचा सिंहाचा वाटा आहे, असे मत प्रा. गटकुळ यांनी व्यक्त केले.
इंदापूर दिव्यध्वनीला सन्मानार्थ चार पुरस्कार…!
इंदापूर येथील दिव्यध्वनीच्या महिलांनी सामाजिक कार्यात महिला संघटन, आरोग्य विषयक शिबिर, महिला सक्षमीकरण कार्यशाळा, गरीब लोकांसाठी अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शालेय मदत, मुक्या जनावरांना चारा वाटप, शेतमजूर, ऊसकामगारांच्या मुलांना शिक्षण असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या शिखर परिषदेसाठी लिनेस महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉ. निर्मला जैन, डॉ. अपर्णा बावस्कर, कुमकुम वर्मा, डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या सचिव उज्वला गायकवाड, डॉ. सीमा पटणे, नलिनी पारेख, उषा दड्डी, डॉ. प्रांजल गुंजोटे, छाया बुराडे, राजश्री जगताप, विद्या गिरमे, रतन पाडुळे, सुनंदा अरगडे, शारदा आजरी, संध्या जाधव, मंजुषा झगडे, शिला आजरी इतर मान्यवर तसेच प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.