Loni Kalbhor News : लोणी काळभोर : अटल इनोवेशनच्या स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.
मुंबई येथे अटल इनोवेशनच्या मार्फत स्टेम स्पार्क स्पर्धा नुकतीच पार पडली. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक शाळांना सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उपकरणे बनवून सादर केली होती. या स्पर्धेसाठी विद्यालयाचा विद्यार्थी राज काळभोर व दीपक येवते यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनविली होती.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली इलेक्ट्रिक स्कूटर या इनोवेशन स्पर्धेमध्ये विद्यालयाने राज्य प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची निवड बेंगलोर येथे होणाऱ्या देशपातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
या प्रोजेक्टसाठी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, विज्ञान विभागाचे शिक्षक रोहन साठे, पर्यवेक्षिका रेखा पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. तर एमआयटी युनिव्हर्सिटीमधील विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका झोपे मॅडम , गावडे सर, एमआयटीचे विज्ञान विभाग प्रमुख सानप यांचे तांत्रिक व साहित्याबद्दल सहकार्य मिळाले.
दरम्यान, विजेते विद्यार्थी राज काळभोर, दीपक येवते व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचे होतंय सर्वत्र कौतुक
राज प्रशांत काळभोर, दीपक रंगराव येवते हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील मुले आहेत. ते दोघेही पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. या दोघांनीही जिद्द ठेऊन इलेक्ट्रिक स्कूटर बनविली आहे. ही बनविलेली स्कूटर अटल इनोवेशनच्या मार्फत आयोजित केलेल्या स्टेम स्पार्क स्पर्धेत प्रथम आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.