लोणी काळभोर, ता. 13 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलजचा दहावीचा निकाल 94.72 टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत दीपक यवते याने 94.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बोर्डाने गेल्या आठवड्यातच बारावीचा निकाल घोषित केला होता. तर मंडळाने आज मंगळवारी (ता. 13) दुपारी 1 वाजता दहावीचा परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला. या परीक्षेसाठी विद्यालयातून 231 विद्यार्थी बसले होते. यातील 218 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाचा विद्यार्थी दीपक रंगराव यवते याने 94.80 टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आदित्य शिरसल कांबळे याने 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय तर युवराज दत्तात्रय चव्हाण याने 89.80 टक्के गुण मिळवू तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांना पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी, केंद्र संचालक अन्सार पिरजादे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा.अर्जुन कचरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.