लोणी काळभोर (पुणे): हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना विरोधी पॅनेलचे प्रमुख प्रकाश जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामधून सहा एकरची शंभर एकर अशी तुमची प्रगती झाली आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची किमान ५० प्रकरणे मी पुराव्यानिशी देऊ शकतो. हिंमत असेल तर जाहीर सभेत समोरासमोर चर्चा करण्याची तयारी ठेवा, मग मी ते पुरावे दाखवतो. सिटीझन बँकेसंदर्भात पुरावे द्या, मग त्यानंतरच आरोप करा. अगोदर स्वतःच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नीट चालवा. मगच यशवंत सहकारी साखर कारखाना चालवण्याचे स्वप्न बघा, असा थेट हल्ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांच्यावर केला आहे.
लोणी काळभोर येथे अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रकाश म्हस्के यांनी ही टीका केली. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, कारखान्याचे माजी संचालक महादेव कांचन, कमलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परीषदेत प्रकाश म्हस्के म्हणाले, बाजार समितीचे अध्यक्ष असताना प्रकाश जगताप यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. मी सभापती असताना शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या वाचनालयाची १ कोटी रुपये किमतीची ६०० स्क्वेअर फूट जागा स्वतःच्या मेव्हण्याला दिली. आज त्या जागी भाड्याने दिलेले मेहुण्याचे हाॅटेल आहे. बाजार समिती समोरील ४ कोटी रुपयांची ३००० स्क्वेअर फूट जागाही मेव्हण्याला दिली आहे. मांजरी येथील बाजारासाठी ५ एकर जागा ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने विकत घ्यायची, असे तत्कालीन संचालक मंडळाने ठरवले होते. मात्र, सभापती प्रकाश जगताप यांनी ११० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने ही जागा खरेदी केली. या व्यवहारात बाजार समितीला २५ वर्षांपूर्वी ६७ लाख रुपये नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीच्या गेटचे ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने ठरलेल्या कामाचे प्रकाश जगताप यांनी ४२५ रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने पैसे दिले. पार्किंगच्या टेंडर मध्ये किती पैसे खाल्ले ?
प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या सध्याच्या बाजार समितीमधील कारभाराबाबत बोलताना प्रकाश म्हस्के म्हणाले, प्रकाश जगताप या निवडणुकीत कसे निवडून आले, याची माहिती सर्वांनाच आहे. अपात्र २७२ सभासदांमुळे तुम्ही परत बाजार समितीत निवडून आला आहात. पंधरा वर्षांपूर्वी तुम्ही सभापती असताना झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी मुलाणी समितीने केली आहे. तो अहवाल ही व्यवस्थित वाचून घ्या. कारण तुमच्या काळ्या कामाचे पुरावे या समितीनेच जाहीर केलेले आहेत. मागील संचालक मंडळाप्रमाणेच याही वेळच्या संचालक मंडळात प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर हे संचालक म्हणून निवडून जाताच मच्छी बाजार तयार करण्यासाठी ३५ व्यापाऱ्यांकडून किती पैसे घेतले आहेत, याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. कोण, कुठे व कसे पैसे घेतात याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. या दोघांच्या कारभारामुळेच सध्याचे संचालक मंडळ बदनाम झाले आहे.
प्रकाश म्हस्के पुढे म्हणाले, काही वर्षांपुर्वी किकची स्प्रिंग तुटलेली मोटार सायकल वापरणाऱ्या व्यक्तीने असे कोणते व्यवसाय केले, त्यामुळे २५ वर्षांत तुमची आर्थिक परिस्थिती इतकी बदलली. याचे उत्तर मतदारांना द्या. सहा एकर ते शंभर एकर अशी तुमची प्रगती झालेली आहे. एवढी प्रगती होणारा व्यवसाय कोणता आहे. आमच्यावर आरोप करण्यापुर्वी तुमच्यात हिम्मत असेल तर जाहीर सभेत त्याबाबतचे पुरावे घेऊन चर्चा करायला या. स्वतःच्या चार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था थकबाकीत आहेत. त्या संस्था व्यवस्थित व नफ्यात चालवा आणि मगच यशवंत कारखाना चालवायचे स्वप्न बघा.
सिटीझन बँक व खरेदी-विक्री संघाबाबत झालेल्या आरोपांबाबत बोलताना प्रकाश म्हस्के म्हणाले, १८ वर्षे बंद असलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे कर्ज फेडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार १२ गुंठे जागा विकसित केली आहे. त्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज फेडले आहे. सध्या संघाकडे ७० लाख रुपयांच्या ठेवी असून एक रुपयाही कर्ज नाही. प्रशांत काळभोर यांनी या संघामध्ये अध्यक्ष म्हणून काम केले आहे, आता संचालक आहेत. त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे. मात्र केवळ आरोप करायचा म्हणून आमच्यावर आरोप केला जात आहे. सिटीझन बँकेचा अध्यक्ष झालो, त्यावेळी ५१ लाख रुपयांची ठेव व ७ शाखा होत्या. माझा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला, त्यावेळी शाखांची संख्या ही वाढली होती आणि ठेवी या १६१ लाख रुपये होत्या. त्यानंतर तिघांच्या गैरव्यवहारामुळे बँक अडचणीत आली. शासकीय निर्णयामुळे बँक अभ्युदय बँकेत विलीन झाली. ही बँक कुणाच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आली, ते तुमच्या राजकीय गुरुला विचारा, ते व्यवस्थित माहिती देतील. सर्वांना माहिती आहे की, मी बँकेचा विकास किती केला आणि त्या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या.
प्रकाश म्हस्के पुढे म्हणाले, आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता, यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलचा विजय हा पक्का झालेला आहे. निवडणुकीपूर्वीच आमच्या पॅनेलच्या एका उमेदवाराने बाजी मारली आहे. राहिलेल्या २० जागेवरील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास आहे. ज्यांना पुर्ण पॅनेल उभा करता येत नाही, ते निवडणुक लढवायला निघाले, असा टोलाही म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांना यावेळी लगावला.