राजु देवडे
लोणी धामणी : पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील गावाला पाणी पुरवठा करणारी विहीरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसल्याने गावाला विजेशिवाय पाणी मिळणार आहे. बहुतांश भागाला भारनियमानचे चटकेही सहन करावे लागतात. या तुटीतूनच आज सौर ऊर्जेला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून किमान पाणीपुरवठा विजेविना सुरळीत सुरू राहणार असून, वीज बिलावरील खर्च वाचला व विजेचीही बचत झाल्याची माहिती सरपंच निलम वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी दिली.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी १० लाख रुपये खर्चाची सुधारित नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले. नवीन योजना कार्यान्वित झाली असून, विहिरीवरील मोटारीसाठी विजेचा वापर न करता सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आले आहे. त्यावर साडेसात अश्वशक्तीची मोटार चालवण्यात येत आहे. यामुळे दर महिना सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा वीज बिलाचा खर्च वाचला आहे. शिवाय विजेचीही बचत होणार आहे. पूर्वी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास पाणी पुरवठा योजना बंद पडत होतो.
आता सौर ऊर्जेच्या पॅनेलमुळे योजना बंद पडणार नाही. जुन्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील मोटारीसाठीही सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.