लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक समोरून आलेल्या दुचाकीला वाचवताना पोलिसांची गाडी घसरून अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलजवळ शुक्रवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी आहे.
श्रीपाद गायकवाड (वय 24 सोलापूर) व अमोल सोनवणे (वय 25, शिरसगाव फाटा तालुका शिरूर) असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद गायकवाड व अमोल सोनवणे हे दोघेही मागील एक महिन्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते. ते दोघेही नुकतेच वालचंद नगर पोलीस ठाण्यात रुजू झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलीस दलात परेड असल्याने दोघेही दुचाकीवरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलजवळ त्यांची दुचाकी आली असता अचानक त्यांच्या दुचाकीच्या समोर एक दुचाकीस्वार आला, त्यांनी अपघात टाळण्यासाठी दुचाकीचा अर्जंट ब्रेक दाबला आणि दुचाकींचा समोरासमोरील अपघात टळला.
मात्र, अचानक ब्रेक दाबल्यानंतर त्यांची दुचाकी स्लिप झाली या अपघातात श्रीपाद गायकवाडच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला तर अमोल सोनवणे याला किरकोळ मुका मार लागला आहे.
दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी दोन्ही जखमींना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यातील पोलिस अंमलदार श्रीपाद गायकवाड याची प्रकृती गंभीर आहे. अमोल सोनवणे यांनी तीन वेळा नॅशनल बॉक्सरशिप जिंकलेली आहे. तसेच त्यांनी पोलीस गेम्स लिगमध्ये नुकतेच सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर सुदैवाने या अपघातात अमोल सोनवणे या बॉक्सरला किरकोळ जखमा झाल्या आहेत.