लोणी काळभोर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते लोणी काळभोर या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून 24 X 7 म्हणजेच आठवड्यातील सात दिवस चोवीस तास अशी नॉनस्टॉप वसुली सुरु आहे. तर कवडीपाट टोलनाका हा वाहतूक पोलिसांचा हप्ता वसूलीचा अड्डा बनला आहे. अवैध प्रवासी वाहतूक ही हडपसरची डोकेदुखी ठरत असून वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम वाहतूक नियमन की पठाणी वसुली ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकात कार व क्रेनचा बुधवारी (ता.30) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. हा अपघात झाल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा भाजप सोशल मिडियाचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, माजी सरपंच नंदू काळभोर, उद्योजक शामराव पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवून दोन्ही वाहनचलकांना वाहने बाजूला काढण्यासाठी मदत केली. मात्र, अर्धा तास उलटल्यानंतरही वाहतूक पोलिस घटनास्थळी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आले नव्हते. त्याचवेळी वाहतूक विभागातील पोलिस पुणे-सोलापुर महामार्गावरुन ये-जा करणाऱ्यांकडून वसुलीचे काम करत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
हडपसर ते लोणी काळभोर या दरम्यान पंधरा नंबर, शेवाळवडी, फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व नायगाव फाटा या 6 ठिकाणी वहातुकीची कोंडी सतत जाणवत आहे. मात्र, लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस ऑनलाईन दंड व पावत्या फाडण्यात दंग आहेत. त्यामुळे ही वाहतूककोंडी सोलापूर, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे शेतकरी, कामगार तसेच शहरात रोजगार मिळवण्यासाठी जाणाऱ्या लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन परिसरातील सर्वसामान्य नागरिकानां कामानिमित्त बाहेर पडावे लागते. अशा सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच पाठीमागून त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारण्यात येत आहे. दंड जरी लगेच द्यावा नाही लागला, तरी भविष्यात हा दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. तर या भागातील खासदार, आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मूग गिळून गप्प बसल्याने, पोलिसांच्या पठाणी वसुलीचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसू लागला आहे.
नायगाव चौक बनला अडथळ्यांचा थांबा
मागील पंधरा दिवसांपासून कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव चौकात सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, लोणी काळभोर वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी कवडीपाट टोल नाक्याजवळ घोळक्याने थांबून नागरिकांकडून मोठा दंड वसूल करीत आहेत. नायगाव चौका हा अडथळ्यांचा थांबा बनत चालला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणारे पोलिसांचे पाहुणे का ?
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते. हडपसर गाडी तळावर थांबणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हडपसरच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना सुटका मिळेल, अशी आशा होती. मात्र त्यांच्या आशेची घोर निराशा झाली आहे. कारण तीन दलालांच्या माध्यमातून पुन्हा अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हडपसरची वाहतूक कोंडीची परिस्थिती जैसे थी झाली आहे. तर हडपसर ते यवत या दरम्यान, रिक्षा व सिक्स सिटरमधून माणसांना जनवारांसारखे कोंबून धोकादायकरीत्या अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा वाहनांवर कारवाई तर दुरच, पोलिस साधे हटकतही नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणारे पोलिसांचे पाहुणे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.