पुणे : पुण्यात भटक्या श्वानांची संख्या प्रचंड आहे. त्यांची उत्पत्ती वाढू नये, तसेच ‘रेबीज फ्री पुणे’ करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील १ लाख ८० हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीचा डोस देण्यात येणार आहे. मात्र, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाखो भटक्या श्वानाचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पुणे महानगर पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. सारिका फुंडे यांनी पुणे रेबीज फ्री करण्यासाठी शहरात लसीकरणाची मोहित हाती घेतली आहे. शहरातील कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि नसबंदीसाठी आरोग्य विभागाने पाच संस्थांची नियुक्ती केली आहे. त्या संस्थांमार्फत कुत्र्यांना पकडून तेथेच रेबीजचा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या वतीने रेबीज लसीकरणाची मोहित राबविण्यात येत आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ग्रामीण भागातही राबविणे अत्यावश्यक आहे. कारण शहरापेक्षा ग्रामीण भागात भटक्या श्वानांची संख्या जास्त आहे. तसेच ग्रामीण भागातच श्वान चावल्याच्या घटना जास्त आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात असलेल्या लाखो भटक्या कुत्र्यांचेही मोफत रेबीज लसीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रेबीज लसीकरण केल्यामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून माणसांनाही रेबीज होत नाही. म्हणून हे लसीकरण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. पुणे शहरात सन २०२३ साली श्वानांनी ३३ हजार ११७ नागरिकांना चावा घेतला आहे. यामध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
रेबीज हा जीवघेणा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला एकदा रेबीज झाला की, त्याचा मृत्यू हमखास होतो. रेबीज हा प्राण्यांच्या चाव्यापासून माणसाला होतो. प्राण्यांच्या चाव्यातून तो माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टिमवर (मज्जासंस्था) हल्ला करतो. मज्जासंस्थेतून तो मेंदूपर्यंत पोहचतो. त्यानंतर रुग्णाचा मृत्यू निश्चित होतो.
समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक म्हणजे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न. ही एक अत्यंत गंभीर होत चाललेली समस्या आहे. भटके कुत्रे चावा घेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या श्वानांची नसबंदी करण्यासाठी १ ते २ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे या चांगल्या कामासाठी ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेतला पाहिजे.
– गणेश कुंजीर (श्वान प्रेमी, थेऊर, ता. हवेली)