लोणी काळभोर, (पुणे) : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून (NHAI) मागील तीन महिन्यांपूर्वी पुणे – सोलापूर महामार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. अनेक ठिकाणी केलेले डांबरीकरण, बुजविलेले खड्डे व केलेली डागडुजी उघडी पडली आणि परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे वाहनधारक व पादचारी मात्र उडणाऱ्या धुळीमुळे व कच खडीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजारास सामोरे जावे लागत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी, कदमवाकवस्तीतील पीराचे मंदिर परिसर, लोणी स्टेशन, नायगाव व आळंदी म्हातोबा गावाकडे जाणारा चौक, सोरतापवाडी तसेच उरुळी कांचन परिसरात तात्पुरती मलमपट्टी करीत परिसरातील खड्डे बुजवले जात आहेत. मात्र सतत मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची केलेली मलमपट्टी उघडी पडली आहे व मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. रस्ता बुजविण्यासाठी वापरण्यात आलेले निकृष्ठ डांबर व कच खडी तसेच रस्त्याच्या बाजूला पडलेली माती वर आल्याने धूळ निर्माण होत आहे. त्यामुळे याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणारा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
धूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसननलिकेत जातात. ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी केलेल्या कामातील कच, खडीचे कण हवेत मिश्रण होऊन नागरिकांसाठी अपायकारक ठरत आहे. वायु प्रदूषणात भर पडली असून, यामुळे नागरिकांमध्ये सौम्य ते दीर्घ काळातील आरोग्य समस्या उद्भवत आहेत.
सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावले आहेत. लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून महामार्गाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांच्या कामाच्या वेळी पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्थाच केली नसल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या देखबाल व दुरुस्तीचे काम सुरु आहे. पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहे. येत्या दोन दिवसात रस्त्याची पाहणी करून पुन्हा दुरुस्ती व डागडुजी करणार आहे.
पंकज प्रसाद (सहाय्यक कार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, (NHAI) पुणे)