योगेश मारणे
न्हावरे(पुणे): न्हावरे (ता.शिरूर) येथील त्रिमूर्ती प्लास्टिक्स होलसेल गोडाऊनला सोमवारी (दि.१७) सकाळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती न्हावरे दूरक्षेत्र पोलिसांनी दिली. आगीमध्ये गोडाऊनमधील सर्व साहित्य, मशिनरी, तसेच दीड लाख रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे. या प्रकरणी गुलाब पोपट पडवळ (रा. बोरीपार्धी, ता. दौंड, मूळ रा. कोळगाव डोळस, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी न्हावरे पोलीस दूरक्षेत्रामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरे येथे न्हावरे-चौफुला महामार्गाच्या लगत त्रिमूर्ती प्लास्टिकचे मोठे होलसेल शॉप व गोडाऊन आहे. सोमवारी सकाळी (दि.१७) नऊ वाजण्याच्या सुमारास या महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. चारचाकी गाडी त्रिमूर्ती प्लास्टिक्स शॉपच्या समोर महामार्गालगत असलेल्या विद्युत रोहित्राच्या खांबाला येऊन जोरदार धडकली. त्याच रोहित्रावरून त्रिमूर्ती प्लास्टिक्सचे विजेचे कनेक्शन होते. त्यामुळे चारचाकीची खांबाला जोरदार धडक बसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन त्रिमूर्ती प्लास्टिक्स शॉप व गोडाऊनला आग लागली.
संबंधित चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती चारचाकी युवराज निंबाळकर यांची आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी घटनास्थळी भेट देऊन, पडवळ कुटुंबीयांना शासकीय मदतीचे आश्वासन दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन.बी.जाधव करत आहेत.