पिंपरी (Pune): शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव आणि पुसाणे गावात सुरू असलेल्या दारूभट्ठयांवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने कारवाई केली. रविवारी (दि.२०) या कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
पहिली कारवाई शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर करण्यात आली. पातालसिंग हमराज राजपूत (वय ३२, शिरगाव, मावळ) याने पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये १६ लाख ३४ हजार ८८५ रुपये किमतीचे ४६ हजार ७११ लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई मावळ तालुक्यातील पुसाणे गावात करण्यात आली. एका महिलेने गावातील ओढ्यालगत दारूभट्टी लावली. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने या दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये ८४ हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. या प्रकरणी पोलीस अंमलदार धनंजय भोसले यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.