Pimpri News : पिंपरी : ”माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही, अशी कविवर्य नारायण सुर्वे यांची श्रद्धा होती. ‘साहित्य अकादमीचे मानकरी’ या ग्रंथात साहित्यिकांमधील माणूसपण अधोरेखित करण्यात आले आहे,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे यांनी काढले.
नेरळ येथे कुसुमाग्रज पुरस्कार वितरण संपन्न
नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे गुरुवारी (ता. २६) काढले. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त कानडे यांच्या हस्ते प्रदीप गांधलीकर यांना कुसुमाग्रज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.(Pimpri News) नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, कामगार साहित्यिक अरुण गराडे, नारायण सुर्वे यांचे जावई गणेश घारे, कन्या कल्पना घारे यांची उपस्थिती होती.
उद्धव कानडे पुढे म्हणाले की, “कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी नारायण सुर्वे यांना आपला मानसपुत्र मानले होते. जात, धर्म, पंथ, आर्थिक स्थिती या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन सुर्वे यांनी आयुष्यभर आपल्या कवितेच्या माध्यमातून माणसातील माणूसपण जागवण्याचे काम केले. (Pimpri News) सर्वसामान्य रसिकांसह प्रत्येकाला लेखकांविषयी विशेष कुतूहल वाटत असते. प्रदीप गांधलीकर यांनी लिहिलेल्या ‘साहित्य अकादमीचे मानकरी’ या ग्रंथात अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांचा माणूस म्हणून शोध घेण्यात गांधलीकर यशस्वी झाले आहेत.”
सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराला उत्तर देताना प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करीत “हे कविवर्या सुर्वे नारायणा…” ही कविता सादर केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून काव्यजागर करण्यात आला. त्यामध्ये पुरुषोत्तम सदाफुले यांनी,
“आत्मा आजवर कुणाला कधीच दिसला नाही…
म्हणून तो आम्हाला अजुनी कळला नाही…”
ही कविता सादर करून कृष्णामाई आणि नारायण सुर्वे या दांपत्याच्या हृद्य ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश कंक यांनी,
“घामाच्या प्रत्येक थेंबात
कष्ट करणाऱ्या प्रत्येक हातात
हल्ली मला कवी नारायण सुर्वे दिसतात…”
ही कविता सादर केली.
अरुण गराडे यांनी, “सुर्वे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी एका पुस्तकाचे लेखन केले आणि आता दुसऱ्या पुस्तकाचे लेखन सुरू आहे,” असे नमूद करून कामगार क्षेत्रातील विविध घडामोडींचा ऊहापोह केला. उद्धव कानडे यांनी,
“सुर्वे म्हणाले होते एकदा
जाति-धर्माच्या कचाट्यातून सुटलो
म्हणूनच माणूस म्हणून मी उरलो…”
या कवितेचे सादरीकरण करून सुर्वे यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये उलगडून सांगितली.
सुदाम भोरे यांनी आपल्या मनोगतातून, “नारायण सुर्वे यांनी कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला कवितेतून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. मी व्यावसायिक असल्याने कष्टकरी हातांना काम देण्याचा प्रयत्न करतो. (Pimpri News) त्यामुळे माझीही सुर्वे यांच्याशी भावनिक नाळ जोडलेली आहे, याचे समाधान वाटते,” अशी भावना व्यक्त केली. गणेश घारे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना घारे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्या हाती ठाकरे गटाचे शिवबंधन
Pimpri News : दांडिया लागल्याच्या रागाने दोघांना कोयत्याने मारहाण; चौघांना अटक, एक पसार
Pimpri News : मनोज जरांगे पाटलांना पाठिंब्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण