लोणावळा : लोणावळ्यात टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे उभारण्यात येणाऱ्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी सुमारे ३३३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. हा प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असल्याने पुण्यातील मावळ तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना मिळावी यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सर्वप्रथम २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (११ मार्च २०२२) अर्थमंत्री अजित पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
असा असेल प्रकल्प
- सुमारे ४.८४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार
- परिसर विकासासह, भुशी डॅम ते लायन्स पॉईंट रस्ता रुंदीकरण
- १२० मीटर लांब व ६ मीटर रुंद ग्लास स्कायवॉक
- लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल
- झिप लाईन, बंजी जम्पिंग
- वॉल क्लायबिंग सारखे साहसी खेळ
- १००० व्यक्तींकरिता एम्फी थिएटर
- फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश व ध्वनी शो