पिंपरी: पिंपरी कॅम्प परिसरात जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन विधी संघर्षित मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पिंपरी पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही तक्रार पिंपरीतील रहिवासी सनी बन्सीलाल दनानी (वय 27, ब्लॉक सी-17, वैष्णवी मंदिराजवळ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी शेफर जेविन जेकब (वय 41, सध्या रा. माय होम बिल्डिंग ए-204, मुकाई चौकाजवळ, मूळ रा. कॅलिफोर्निया, अमेरिका), स्टीवन विजय कदम (वय 46, रा. फ्लॅट क्रमांक 501, रायसोनी सोसायटी, अजमेरा, पिंपरी) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रलोभन देऊन धर्मांतराचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिंधी समुदायातील नागरिकांना विविध प्रलोभन दाखवत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत होते. बायबलचे पत्रके वाटून, “प्रभू येशूच खरा देव आहे”, “इतर धर्म काल्पनिक आहेत”, तसेच “धर्मांतर केल्यास सुख, शांती व आर्थिक मदत मिळेल”, असे आमिष देण्यात येत होते.

दोघांना अटक, मोबाईल जप्त
पोलिसांनी शेफर जेकब आणि स्टीवन कदम या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. संबंधित अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 299, 3(5) तसेच विदेशी नागरिक कायद्यांतर्गत कलम 14 (b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.







