पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात १ लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला आहे. तसेच २०१९ ला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी पराभव केला होता. त्यावेळी मी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो. यामुळे त्यांच्या पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच आहे, असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले. त्यांनी पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी सवांद साधला.
संजोग वाघेरे म्हणाले, लोकसभा निवडणूक हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एवढी मोठी निवडणूक ही माझ्या जीवनात पहिलीच आहे. २०१४ पासून लोकसभा लढवायची हे मी ठरवलं होतं. माझे काही मित्र खासदार आणि आमदार झाले, मलाही वाटलं आपणही व्हावं. तसेच मतदारसंघातील अपेक्षा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना म्हणाले, दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश असल्याने थांबलो. अखेर शिवसेना ठाकरे गटाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मतदारसंघातून मोठा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. विरोधकांनी गद्दारी केली हे लोकांना पटलं नाही, असेही वाघेरे म्हणाले. अजित पवारांनी मला ठाकरे गटात पार्थचा बदला घेण्यासाठी पाठवलं नाही. तसे अजित पवार यांच्याशी बोलणं झालं नाही.
मात्र, २०१९ ला राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो. ज्या उमेदवाराचे आपण काम केलं. त्याला निवडून आणता आलं नाही. याची चीड माझ्या मनात निश्चित आहे. एक्झिट पोलवर ते म्हणाले, बारणे जिंकतील हा जर तर चा प्रश्न आहे. उद्या कळेल कोण जिंकेल. मला विश्वास आहे महाविकास आघाडी जिंकेल, असे संजोग वाघेरे म्हणाले.