हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन ही गावं मंगळवारी (ता. ३१) बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यात उरूळी कांचन येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही गावे मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. पूर्व हवेलीतील अनेक गावांतील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत गावोगावी साखळी उपोषण सुरू केले आहे.
राजकीय नेत्यांना गावबंदी..
मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार व खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत. लोणी काळभोर व उरुळी कांचन येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणास दररोज मराठा समाजातील महिला, तरुण, व वयोवृद्ध नागरिकांचा यांचा सहभाग वाढत आहे. साखळी उपोषणाची दखल सर्वच राजकीय पक्षाच्या मराठा नेत्यांनी घेतली आहे.
लोणी काळभोरमध्ये मराठा बांधव उपोषणाला..
राज्य सरकारने दिलेला अवधी संपूनही सरकारकडून काही ठोस निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी लोणी काळभोर येथील सूर्यकांत काळभोर हे लोणी काळभोर गावात आमरण उपोषणास बसले आहेत. तर उरुळी कांचन या ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे. या आमरण उपोषणास गावातील मुस्लिम समाजासह इतर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा..
लोणी काळभोर येथील आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस गुलाब गायकवाड यांनी समक्ष हजर राहून पाठिंबा दिला आहे. तसेच हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, नायब तहसीलदार स्वाती नरुटे, नाथाजी सगर, सर्कल जयश्री कवडे व तलाठी पद्मिनी मोरे यांनी ही सोमवारी (ता. ३०) उपोषण स्थळी भेट दिली.
उद्या तीनही गावं बंद ग्रामस्थांचा निर्णय..
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन ही गावे उद्या दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. या संदर्भात सकाळी दहा वाजता लोणी काळभोर तसेच उरुळी कांचन येथे गावातील उपोषणस्थळी गावकऱ्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील धोरण ठरवण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, ‘मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकदिवसीय गाव बंद करण्यात येत आहे. तसेच मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत उरुळी कांचन येथील साखळी उपोषण सुरुच राहणार आहे’
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील उपोषणकर्ते सुर्यकांत काळभोर म्हणाले, ‘सरसकट सर्व मराठा समाजातील नागरिकांना कुणबीचा दाखला देण्यात यावा. लाठीचार्जच्या वेळी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. आत्महत्या केलेल्या तरुणांच्या घरच्यांपैकी एका व्यक्तीला सरकारी सेवेत रुजू करून घेण्यात यावे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोणी काळभोर या ठिकाणी आमरण उपोषण सुरुच राहणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नायगाव, कोरेगाव मूळ, हि गावेही बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा दिला. यावेळी तरुणी व महिलांचा मोठा समावेश होता.