पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार यासह फसवणुकीचे अनेक प्रकारही समोर आले आहेत. असे असताना चिंचवड येथील संभाजीनगर भागात एका डॉक्टर महिलेची फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 89 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
संबंधित महिला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असलेल्या रुग्णानेच गंडा घातला आहे. त्याने त्याच्या बांधकाम साईटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यामध्ये त्याने गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा फ्लॅट देण्याचे दाखवले होते. या आमिषाला बळी पडून डॉक्टर महिलेला फसवले. त्यानुसार, महिलेकडून आत्तापर्यंत 89 लाख 58 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. ही घटना डिसेंबर 2012 ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडली.
महिला डॉक्टरला फ्लॅट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठत आरोपी राजेश घेवरचंद जैन (वय 47, रा. जी फ्लोर, नगीनदास मास्टर लेन, फोर्ट, मुंबई) याच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रकार
संभाजीनगर येथे महिला डॉक्टरचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये आरोपी राजेश जैन उपचार घेण्यासाठी येत होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये ओळखी निर्माण झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांना वडाळा मुंबई येथील बांधकाम साईटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, पैसे गुंतवले मात्र फ्लॅट त्याने दिला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली.